| रसायनी | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील घोसाळवाडी येथील यश सुर्वे (19) हा तरुण शनिवारी (दि.10) रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून भोकरपाडा येथून मोहोपाड्याच्या दिशेने जात होता. भोकरपाडा स्टॉपजवळ त्याच्या पुढे टँकर जात असल्याने त्याला ओव्हरटेक करण्यासाठी यशने हॉर्न दिला. यावेळी पुढे जाणाऱ्या दुसऱ्या वाहनातील चार जणांनी वाहन थांबवून यशची स्कुटी अडवली. त्यानंतर ‘तू कोणाचा मुलगा आहेस?’ अशी विचारणा करण्यात आली. यशने आपण घोसाळवाडी येथील ज्ञानेश्वर सुर्वे यांचा मुलगा असल्याचे सांगितल्यानंतर जगदीश पाटील याने त्याची कॉलर पकडून कानाखाली मारल्या. या प्रकारानंतर यशने आपल्या नातेवाईंकाना या घटनेची माहिती दिली. त्यांनी समजूत काढल्यानंतर यश नातेवाइकांसह घरी जाण्यास निघाला. मात्र, हिरानंदानी गेटजवळ त्याचे वडील ज्ञानेश्वर सुर्वे भेटले. त्यांना घडलेला प्रकार सांगत असताना संबंधित चार जण पुन्हा तेथे आले आणि यशसह नातेवाईकांना शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी यशचे मामा मंदार गोपाळे पुढे आले असता, त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. तसेच, चायनीज दुकानातील चॉपरने त्यांच्या डोक्यात वार करून दुखापत केली. या प्रकरणी जगदीश पाटील, सूरज पाटील ऊर्फ बंटी भुम, निलेश पाटील आणि गणेश पाटील यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरपाड्यात तरूणासह नातेवाईकांना मारहाण
