। पनवेल । वार्ताहर ।
डॉक्टर तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तसेच तिचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तसेच, पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओ असलेला त्याचा मोबाईल जप्त केला आहे.
आनंद दादाभाऊ गते असे आरोपीचे नाव असून तो पुण्यातील भिमाशंकर येथे राहतो. त्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सोशल मीडियावरून पीडित डॉक्टर तरुणीसोबत मैत्री केली होती. त्यानंतर हे दोघे खारघरमध्ये भेटले असता, त्याने पीडित तरुणीला शितपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिला सातारा येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व त्याचे चित्रण त्याच्या मोबाईलमध्ये केले. याप्रकरणी खारघर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडील पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओ असलेला त्याचा मोबाईल जप्त केला आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.







