। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे येथील एका नामांकित शाळेत सरकारी क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका महिलेसह दोघांनी एका सुशिक्षित तरुणाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू कला आहे.
अरुणा जाधव व अमोल राऊत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची 2023 मध्ये नेरूळ येथे मयुर मानकर (30) या सुशिक्षित तरुणासोबत ओळख झाली होती. त्या वेळी अरुणा व अमोल यांनी त्याची कोपरखैरणे सेक्टर 8 मध्ये भेट देऊन त्याला कामोठे येथील नामांकित विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये सरकारी कोट्यातून कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्याच्याकडून गेल्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळले. यात त्यांनी मयुरकडून सहा लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात आणि तीन लाख रुपये रोख, असे एकूण नऊ लाख रुपये उकळले. त्यानंतर त्याला खोटे नियुक्ती पत्र दिले. हे नियुक्ती पत्र घेऊन मयुर संबंधित ज्युनियर कॉलेजमध्ये गेला असता, हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर मयुरने या दोघांकडे पैसे परत मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मयुरने कोपरखैरणे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अरुणा जाधव व अमोल राऊत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक
