फोन फोडल्याचा आरोपाने युवकाची आत्महत्या

| उरण | वार्ताहर |

उरणमधील जासई गावात राहणाऱ्या कोळी दाम्पत्याने गावातील सर्वेश कोळी (20) याच्यावर 40 हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन फोडल्याचा आळ घेतल्याने घाबरलेल्या सर्वेशने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर न्हावाशेवा पोलिसांनी सर्वेशच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या कोळी दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून योगेश कोळी याला अटक केली.

सर्वेश कोळी (20) हा उरण तालुक्यातील जासई बेलापाडा येथे वडील प्रभाकर कोळी व आजी सावित्री कोळी यांच्यासोबत राहत होता. तसेच तो मासेमारी करून कुटुंबाला हातभार लावत होता. 31 डिसेंबर रोजी सर्वेशने गावातील संयोग कोळी याला दारू पाजून, तसेच त्याला मारहाण करून त्याचा 40 हजार रुपये किंमतीचा मोबाइल फोडल्याचा आरोप संयोगचे आई-वडील योगेश कोळी व राजश्री कोळी यांनी केला. कोळी दाम्पत्याने सर्वेशच्या घरी जाऊन त्याच्या आजीसोबत भांडण करून 40 हजार रुपये देण्याची मागणी केली. अन्यथा सर्वेशला ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे सर्वेश मानसिक तणावाखाली होता. यातूनच त्याने आपल्या घरातील वरच्या मजल्यावर जाऊन मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणार्या नायलॉनच्या दोरीने लोखंडी पाइपला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Exit mobile version