। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कुत्रा चावल्याने जखमी झालेल्या युवकाचा मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अमित कोळंबेकर (३८) असे या युवकाचे नाव आहे.
दोन महिन्यांपूर्वी रोहा-ब्राह्मण आळीतील राहत्या इमारतीमध्ये गाडी पार्क करत असताना त्याचा कुत्र्याने चावा घेतला होता. त्यावेळी अमितने त्याकडे दुर्लक्ष केले अन् त्याला रेबिजची लागण झाली. मात्र, शुक्रवारी (दि.12) सकाळी अचानक त्याची प्रकृती खालावल्याने माणगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात दाखल केले. मुंबईमध्ये उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कोळंबेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
रोहा अष्टमी शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. दिड महिन्यांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकाच दिवशी ४ जण गंभीर जखमी झाले होते. गेली दीड ते दोन वर्षे रोहे शहारात मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. हल्ल्यात असंख्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.