| माणगाव | वार्ताहर |
मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. माणगाव शहरातील तीन बत्ती नाक्यावर गुरुवारी (दि.20) रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास कंटेनर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई- गोवा महामार्गावर जुने माणगांव येथील तीन बत्ती नाका येथे गुरुवारी (दि.20) रोजी सकाळी 11.15 च्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या कंटेनरच्या मागच्या टायरखाली येऊन जुने माणगांव येथील राहणारा मोहम्मद रफी इस्माईल जामदार, (39) हा तरुण आपल्या ताब्यातील हिरो होंडा फॅशन घेऊन जात असताना तीन बत्ती नाका येथे कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडून मोहम्मद रफी इस्माईल जामदार याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद जामदार हा जुने माणगांव येथील रहिवासी असून, व्यवसायाने इलेक्ट्रिशन प्लबिंग, एसी फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होता. तसेच, जामदार हा “आपदा मित्र”म्हणून माणगांव मध्ये साळुंखे रेस्क्यू टीम मध्ये देखील कार्यरत होता. मोहम्मद रफी इस्माईल जामदार च्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. माणगांवमध्ये सततची वाहतूक कोंडी असते. माणगाव बायपासचे काम रखडले आहे. होळी सणासाठी कोकणात चाकरमानी येत असतात. माणगाव शहरात होळी सणापासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवित असल्याने वाहतूक कोंडी अधिक भर पडते. या अपघातानंतर संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत मुंबई -गोवा महामार्ग रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी माणगांव पोलीस ठाणे टीम, माणगांव वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस तातडीने दाखल झाले. त्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.