उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील धाकटी जुई येथील रेश्मा अमित घरत व सुजाता मनोज घरत या महिलांनी विविध योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यांनी एकूण 85 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच, घेतलेले पैसे परत देत नसल्याने व दमदाटी करत असल्याने त्यांच्यावर आर्थिक फसवणूकी संदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील पागोटे, जेएनपीटी येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे सुजित हसुराम तांडेल यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. त्यांची पत्नी हर्षाली तांडेल हिची मैत्रीण रेश्मा घरत (धाकटी जुई) हिचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान, हर्षाली हिने पती सुजित यांना रेश्मा घरत हिच्याकडे एक व्यवसायाची योजना असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सुजित यांनी रेश्मा घरतकडे असलेल्या व्यवसायाच्या योजनेत जर 20 लाख रुपये गुंतवले तर त्या मोबदल्यात त्यांना ती दोन महिन्याला 1 लाख रुपये परतावा देईल. तसेच, एक वर्षानंतर रेश्मा हिने गुंतवलेली मुद्दल 20 लाख रुपये व त्यावरील परतावा 7 लाख असे एकूण 27 लाख रुपये देण्याचे आमिष तिने दिले होते. त्याप्रमाणे रेश्मावर विश्वास ठेवून तांडेल दांम्पत्यांनी डिसेंबर 2023 मध्ये एकूण 20 लाख रुपये तिला दिले.
दरम्यान, तांडेल दांम्पत्यांनी रेश्मा घरतकडे दिलेले पैसे परत मागितले. परंतु, रेश्मा हिने ते पैसे सुजाता घरत यांच्याकडे गुंतविले असून तिच्याकडुन पैसे आल्यावरच तुमचे पैसे देते, असे वारंवार तिच्याकडून सांगण्यात येत होते. त्यांनतर तांडेल दाम्पत्यांनी सुजाता घरतकडे जाऊन गुंतविलेले रक्कम व परतावा मागितला. मात्र, सुजाता घरतने एक महिना वाढवून देण्याची मागणी केली. तसेच, रेश्मा घरत हिने ऑगस्ट 2024 रोजी बॉण्ड पेपरवर 20 लाख रुपये परत देणार असल्याचे लिहून दिले. त्याचबरोबर तांडेल यांना त्यांच्याकडुन दोन कोरे चेक देण्यात आले होते. मात्र, ते दोन चेक सुद्धा वटले नाहीत. पुन्हा तांडेल दाम्पत्यांनी रेश्मा आणि सुजाता यांच्याकडे पैसे मागितले असता त्या म्हणाल्या की, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत. तुम्ही माझ्याकडे वारंवार येऊ नका. नाहीतर मी तुमच्यावर महिलेला घरी येऊन त्रास देता अशी पोलीस ठाण्यात तक्रार देईन, अशी धमकी देखील दिली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तांडेल दाम्पत्यांनी उरण पोलीस ठाण्यात रेश्मा अमित घरत व सुजाता मनोज घरत यांच्याविरोधात दि.18 मार्च रोजी तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा अधिक तपास उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत. त्याचबरोबर रेश्मा घरत व सुजाता घरत यांनी आणखी कोणाची आर्थिक फसवणूक केली असेल तर उरण पोलीस ठाण्याला कळवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
आणखी दोन ठिकाणी फसवणुक
बोरखार-दिघोडे येथील भुमिका गावंड (38) हीला रेश्मा घरत व सुजाता घरत या दोघींनी स्वस्तामध्ये उलवे नोड येथे फ्लॅट घेउन देतो असे अमिष दाखविले. त्यासाठी तिच्याकडुन ऑगस्ट 2023मध्ये 40 लाख रूपये रक्कम घेतली होती. मात्र, त्यामोबदल्यात तिला फ्लॅट दिला नाही. तसेच, घेतलेली रक्कम देखील परत केली नाही. भुमिका गावंड यांनी रक्कम परत मागितली असता त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. तसेच, धाकटी जुई येथील परी घरत (30) व मालती घरत यांना सुजाता घरत हीने एका व्यवसायासाठी पैसे गुंतवणुक करून त्यावर तीन महिन्यात 5 टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्याकडुन एकूण 25 लाख 60 हजार रू. रोख रक्कम घेतली. त्यामोबदल्यात त्यांना व्यवसायातील परतावा तसेच त्यांची मुद्दल देखील परत दिली नाही. त्यामुळे त्यांची फसवणुक केल्याची बाब समोर आली आहे.