टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी।

तळोजा औद्योगिक वसाहतीतील आयजीपीएल फाट्याजवळ भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी पोलीस चौकीसमोर हा अपघात झाला. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातात राहुल यादव याचा मृत्यू झाला. तो तोंडरे गावात राहत असून, खोणी येथील एका गोदामात पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. त्याच गोदामात काम करणारा रोहन मुंबईकर याच्यासोबत राहुल दुचाकीवरून खोणीच्या दिशेने जात होता. आयजीपीएल फाट्याजवळ पोहोचले असता पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राहुलचा जागीच मृत्यू झाला, तर रोहन गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टँकरचालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version