| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील ऊन्हेरे येथील धरणामध्ये बुडून डोंबिवली येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.2) दुपारी दीड वाजता गुरुनाथ साठीलकर यांच्या अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अविनाश दिनेश विचारे (वय 29) राहणार डोंबिवली हा आपल्या मित्रांसमवेत हळदीसाठी सुधागड तालुक्यात आला होता. बुधवारी (दि.1) तो आपल्या मित्रांसमवेत उन्हेरे येथील धरणात पोहण्यासाठी गेला. मात्र पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो धरणामध्ये बुडाला. गुरुनाथ साठीलकर यांच्या अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, दर्श अभानी, राजेश पारठे, महेश भोसले, विशाल चव्हाण, सौरभ घरत, ओम ठकेकर, जय भोसले, निलेश यादव व प्रदीप गोळे यानी अद्ययावत उपकरणांच्या सहाय्याने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी पाली पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांनी सदर ठिकाणी पंचनामा केला. तर रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश कोळी व पाली पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.