। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आसरे होम, गुरूद्वारा शेजारी रिस रसायनी येथे लेबरच्या कामासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल येथील शारदाप्रसाद मिठाईलाल (34) हा युवक गुरूद्वारा शेजारी रिस येथे लेबरचे काम करण्यासाठी गेला होता. कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत असताना साईटवरील पिलरची उंची कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही, यामुळे तो पिलरवरून खाली पडून त्याच्या डोक्याच्या उजव्या भागास मार लागून गंभीर दुखापत झाली. त्यास उपचारासाठी तात्काळ एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. याबाबत पवनकुमार मिठाईलाल हा मृत व्यक्तीचा भाऊ याने रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सहा. फौजद्दार कोळेकर अधिक तपास करीत आहेत.







