लोणावळ्यात तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

। खोपोली । प्रतिनिधी ।

लोणावळा येथील खंडाळा टेकडीवर प्रज्वल वसंत गिरी (26) याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सनसेट पाहताना पाय घसरून तो सुमारे 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 फेब्रुवारी रोजी प्रज्वल गिरी हा आपल्या नातेवाईकांसह लोणावळा येथे आला होता. लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याने त्याने सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास सनसेट पॉईंट बघण्याचा निर्णय घेतला. हॉटेलमधून बाहेर पडून सर्वजण खंडाळा टेकडीवर सनसेट पाहण्यासाठी गेले होते.

सनसेट पाहत असताना अचानक प्रज्वलचा पाय घसरला आणि तो खोल 70 ते 80 फुट दरीत कोसळला. या अपघातात त्याला डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. डोंबिवली येथील नातेवाईक मंगेश गोसावी यांनी खोपोली पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्राथमिक सोपस्कार पूर्ण केले. पुढील तपासासाठी हे प्रकरण लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

Exit mobile version