| पनवेल | प्रतिनिधी |
प्रशासनाने वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे आणि धोकादायक ठिकाणी लावलेल्या बंदीच्या फलकांकडे पर्यटकांकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खारघर येथील पांडवकडा धबधबा परिसरात शनिवारी (दि.4) एक दुर्दैवी घटना घडली. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून धबधब्याजवळ गेलेल्या 25 वर्षीय तरुणाला पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहून गेलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद (25) असून तो तळोजा फेज-2 येथील रहिवासी आहे. तो मित्रांसमवेत पांडवकडा परिसरात फिरण्यासाठी आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धबधब्याजवळील वेगवान पाण्याच्या प्रवाहात तो अचानक अडकला आणि काही क्षणांतच प्रवाहासोबत वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. वृत्त लिहिपर्यंत तरुणाचा शोध सुरू होता.
दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने काही दिवसांपूर्वीच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अंतर्गत पांडवकडा धबधबा, ओवे कॅम्प धरण तसेच खारघर-तळोजा परिसरातील इतर धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या प्रवेशास बंदी घालून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला होता. पावसाळ्यात वाढणारा पाण्याचा वेग, घसरडे दगड आणि अचानक वाढणारा प्रवाह लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या आदेशानंतरही अनेक पर्यटक चोरवाटांचा वापर करून धबधबा परिसरात प्रवेश करत असल्याचे चित्र कायम आहे. सेल्फी, रील्स आणि साहसी पर्यटनाच्या नादात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याने प्रशासनाच्या बंदीला अक्षरशः हरताळ फासले जात आहे.
Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू
