| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमधील पांडवकडा धबधब्याच्या पाच जण अडकल्याची घटना सोमवारी घडली होती. सुदैवाने या पाचही जणांना वाचवण्यात यश आले आहे.
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर वर्षासाहलीसाठी जाण्याला बंदी असतानाही मुंबई येथील पाच शालेय विद्यार्थी धबधब्याच्या माथ्यावर पोहोचले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने, हे लोक खाली उतरू शकले नाहीत व तिथेच अडकले. याची माहिती अग्निशमन दलाच्या पथकाला मिळताच तातडीने ते घटनास्थळी पोहोचले व रेस्क्यू टीमकडून पाचही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली आणले. हे पाचही जण मुंबईतील सायन कोळीवाडा, आंबेडकर चाळ येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. असे असले तरीही ही घटना गांभीर्याने घेऊन खारघर पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत तसेच वर्षासहलीसाठी कोणीही या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन केले आहे.