चौलकर बंधूंच्या घराचे उडाले छप्पर
| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर येथे सोमवारी (दि.26) सकाळी पावणे सातच्या सुमारास पावसाबरोबर आलेल्या वादळात चिरनेर येथील काही घरांचे छप्पर उडाले आहेत. तर काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. चिरनेर गावाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रात्रीपासून दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
उरण तालुक्यातील चिरनेर येथील विष्णू नारायण चौलकर, राम नारायण चौलकर शाम नारायण चौलकर या सख्ख्या भावांच्या राहत्या घराचे संपूर्ण पत्र्यांचे छप्परच वादळी पावसाने उडून गेल्याने या तिन्ही भावंडांच्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. सोमवारी रात्री पावसाची रिपरीप चालू असताना, पहाटे पावसाचा वेग वाढला आणि सकाळी पावणे सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाबरोबर आलेल्या वादळाने चौलकर बंधूंच्या घराचे पत्र्याचे छप्परच उडून गेल्याने चौलकर बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या तिन्ही भावांची कुटुंबे रात्री बाहेरगावी नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्ताने गेली असल्यामुळे दुर्घटना टळली आहे. मात्र घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सोपा, बेड, कपडे अन्नधान्य अशा महत्त्वाच्या चीजवस्तू आणि घरात ठेवलेल्या काही गणेशमूर्ती पावसात भिजल्याने या तिन्ही बंधूंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिरनेर तलाठी सजाचे तलाठी जयहिंद कोळी व कोतवाल नथुराम कातकरी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि वादळी पावसात नुकसान झालेल्या चौलकर बंधूंच्या घराचा तसेच इतर नागरिकांच्या घरांचे पंचनामे करून घेतले. चिरनेर परिसरात शेतवाडीवर अनेक झाडे कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशीही माहिती मिळाली आहे.