| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सोमवारपासून 30 सप्टेंबर 2025 या पावसाळी कालावधीमध्ये 24/7 तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती/दुर्घटना लक्षात घेता सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो.
सोमवार, दि. 26 मे रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या तयारीचा व या कक्षाच्या माध्यमातून पार पाडल्या जाणाऱ्या सर्व सेवा व सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मॉन्सून संबंधित तक्रारींचे वेगाने निराकरण करण्याचे आदेश दिले.
सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 24 तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी 24 तास संपर्कात असतील.
नागरिकांनी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास दूरध्वनी क्र. 022-67918383/8384/8385, 022-27562999, व्हॉटसॲप क्र. 8655683238, टोल फ्री क्र. 18002664098, फॅक्स क्र. 022-67918199 या क्रमांकावर आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.