| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा प्रामुख्याने भात उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील शेतकरी दरवर्षी 25 मेच्या आसपास धूळवाफे (पूर्वपेरणी) करून खरीप हंगामाची सुरुवात करतात. ही पद्धत पारंपरिक असून, जमिनीच्या नैसर्गिक आर्द्रतेचा उपयोग करून भाताच्या बीजांना अंकुरण्यासाठी मदत होते. मात्र, यावर्षी 18 मेपासूनच अवकाळी पाऊस पडत असल्याने या अवकाळी पावसामुळे या महत्वाच्या पेरणीसाठी अनुकूल हवामान मिळाले नाही. परिणामी, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धूळवाफे पेरणी करता आली नसल्याने माणगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील भात पेरणीचे नवे संकट उभारले आहे.
तालुक्यात 25 मेनंतर शेतकरी दरवर्षी धुळवाफे पेरणी करतो. परंतु, अवकाळी पावसामुळे पारंपरिक वेळेनुसार धुळवापे पेरणी करता न आल्याने आगामी मुख्य भात पेरणीवर मोठे संकट उभे राहिले आहे. दरवर्षी माणगाव तालुक्यातील शेतकरी सुमारे 700 ते 800 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात धुळवापफे पेरणी करतात. त्यानंतर सुमारे 7000ते 8000 हेक्टर क्षेत्रावर भात लावणी होते. यंदा धूळवाफे पेरणी हुकल्यामुळे भात पेरणीचे संकट कायम राहिले आहे. माणगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यासाठी आधीच बी-बियाणे आणि खतांचा साठा करून ठेवला होता. मात्र, हवामानाच्या या अनिश्चिततेमुळे त्यांचे संपूर्ण नियोजन बिघडले आहे. आता पेरणीस विलंब झाल्यास भात पीक कमी येण्याची शक्यता आहे, तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात घट येऊ शकते. सरकारकडून हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने वेळीच मदतीचे हात पुढे करून शेतकऱ्यांना पर्यायी पिके, बदललेली पेरणी पद्धती आणि बियाण्यांची निवड याबाबत माहिती दिली, तर परिस्थिती काही प्रमाणात सावरण्याची शक्यता आहे. हवामानातील हे बदल केवळ एक हंगामी अडचण नाही, तर यामागे दीर्घकालीन हवामान बदलही जबाबदार आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी नव्या उपाययोजना आणि धोरणात्मक पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना धुळफेक पेरणी करता आली नाही. हवामान खात्याने पाऊस उघडेल असा अंदाज दिला असल्याने शेतकऱ्यांसाना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांनी ज्या शेतांमध्ये वाफे तयार केले आहेत, त्या ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर पेरणी करता येईल. तालुक्यातील केळगण, कुंभे भागात पाच ते सहा टक्के शेतकऱ्यांनी वरकस जागेवर धूळवाफे पेरणी केली आहे.
पडवळकर,
तालुका कृषी अधिकारी, माणगाव