| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यात दिवसभरात 251 मिमी पावसाची नोंद झाली असून, पावसाने दाणादाण उडवली आहे. तीन दिवसांत 1070 मिमी तर आतापर्यंत 891 मिमी पाऊस कोसळला आहे. याबाबतची माहिती तहसीलदार कार्यालयातील संदेश वाळंज यांनी दिली. सोमवारी झालेल्या तुफान पावसाने तालुक्यात खूप नुकसान झाले आहे.
मंगळवारी सकाळी कोटेश्वरी मंदिरापासून काही अंतरावर तर त्याच रस्त्याच्या पुढील विहुर येथील रस्त्यावर अनेक वर्षांपूर्वीची दोन वडाची झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने अलिबाग जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजूला करण्यात आले. शहरातील अनेक नाले, गटाराचा पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दत्तमंदिर मंदिराच्या डोंगराला भेंगा पडून 120 वेगाने खाली पाणी रस्त्यावर वाहत येऊन खाली असलेल्या काही घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
जोरदार पाऊस त्यात समुद्राला मोठी भरती आल्याने लक्ष्मीखार, उंडरगाव, शिघ्रे येथील घरांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तेलवडे येथे मातीचे धस कोसळून एका घराचे नुकसान झाले, तर उंडरगाव येथे चार ते पाच घरांमध्ये पाणी घुसले आहे. आगरदांडा येथील बौद्ध स्मशानभूमीची भिंत कोसळल्याची घटना घडली, तर मिठागर येथे डोंगराची माती खचल्याने चंद्रकांत ठाकूर यांच्या पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीतील गाळ काढण्याची मागणी लक्ष्मीखार ग्रामस्थांना केली आहे. सकाळच्या सुमारास अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दैना उडाली. डोंगरातून वाहत असलेली सती नदीच्या प्रवाहाचा मार्ग गाळ काढून मोकळा केल्यास कायमचे संकट मिटेल, असे मत ग्रामस्थांनी केली आहे.