| पुणे | प्रतिनिधी |
कोथरूड भागातील कर्वेनगर परिसरात एका पोलीस चौकीजवळ दुचाकी चालकाच्या अंगावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. झाड बाजूला करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. राहुल जोशी (45), रा. धायरी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, राहुल जोशी हे त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. ते कर्वेनगर भागातून धायरीकडे जात होते. ते कर्वेनगर येथील पोलीस चौकीजवळ आले असता त्यांच्या चालत्या गाडीवर अचानक मोठे झाड कोसळले. यात डोक्याला आणि इतर ठिकाणी जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. झाड बाजूला करून मृतदेह ससून रुग्णालयात दाखल केला. दरम्यान घटनेनंतर मोठी गर्दी झाली होती. तर झाडांमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनी ती दूर करुन वाहतूक सुरळीत केली.