| पुणे | प्रतिनिधी |
विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असतानाच खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.26 ) घडली आहे. संतोष गुलाब खांडवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मौजे पाईट-रोंधळवाडीत भामा आसखेड धरण आहे. या धरणावर मासेमारी करण्यास मोठ्या प्रमाणात तरुण असतात. दरम्यान, खांडवे सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास मासेमारी करत होता. त्या वेळी अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. वीज कडाडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. तेव्हा खांडवे जळालेल्या अवस्थेत सापडला. त्याला मित्रांनी तातडीने पाईट गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. याप्रकरणी खेड पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.