तळेकर पती- पती विरोधात गुन्हा दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाडमध्ये गांजाची शेती करणाऱ्यांवर महाड पोलिसांनी कारवाई करीत 50 हजार रुपयांचा गांजा पकडला होता. या घटनेनंतर पुन्हा रेवदंड्यामधील थेरोंडा फाटा येथे गांजा, अंमली पदार्थाची विक्री, व्यवसाय करणाऱ्या तळेकर पती, पत्नीविरोधात रायगड पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या घरात व कॉटेजमध्ये एक लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रेवदंडा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
अर्चना अशिष तळेकर आणिअशिष नंदकुमार तळेकर असे या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांच्या घरात आणि स्वामी माऊली कॉटेजमध्ये गांजा असल्याची अलिबागचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र दौडकर यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार रायगडचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रेवदंडा पोलीस ठाणेतील अधिकारी, कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास थेरोंडा फाटा येथे तळेकर यांच्या घरी आणि त्यांच्या मालकीच्या स्वामी माऊली कॉटेजवर छापा टाकला. या छाप्यात मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा, अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवला असल्याचे दिसून आले. त्यामध्ये सात किलो 672 ग्रॅम वजन असलेले एक लाख 51 हजार रुपये किंमतीचा गांजा तसेच एक हजार रुपये किंमतीचा वजन काटा, पिशव्या, स्टॅपलर असा एकूण एक लाख 52 हजार रुपये किंमतीचा साठा ताब्यात घेण्यात आला आहे. अर्चना तळेकर व अशिष तळेकर यांच्याविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजा विक्रीच्या धंद्याला उत
रेवदंडा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण ओळखले जाते. परंतु, अशिष तळेकर यांच्या सारखे महाभाग कॉटेजच्या नावाखाली गांजा विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालवत असल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. रेवदंड्यातील थेरोंडा फाट्याजवळ येथे झालेल्या कारवाईनंतर या परिसरातील गांजा विक्रीचा व्यवसाय उघड झाला आहे. त्यामुळे या अवैध धंद्याना रोखण्यास पोलिसांना यश येईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.