खड्डा चुकविण्याच्या नादात ब्रेकच्या ऐवजी दाबला एक्सलेटर अन्‌‍…

अपघातात 1 ठार, 4 जखमी
| पनवेल | वार्ताहर |
रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात गाडीचा ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्यानेे गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलटली. या अपघातात गाडीतील 1 जण ठार तर इतर 4 जखमी झाल्याची घटना खारघर येथे घडली.

कार चालक अर्णव बिरारी (18), पक्ष सावरिया (18), यश मोर्या (18), अग्रीम पराशर व दर्श जैन (18) हे पाच जण खारघर पेठ पाडा येथील एन.एन.आय.एम. कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. यातील अर्णव बिरारी या विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांची गाडी कॉलेजमध्ये आणली होती. त्यानंतर हे पाचजण गाडीतून खारघरमध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले.

यावेळी अर्णव गुरुद्वारासमोरील रोडवरुन जात असताना त्याने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने कारचे स्टेअरिंग उजव्या बाजूस वळविले असता ही गाडी रस्ता दुभाजकाला घासली त्यामुळे गोंधळलेल्या अर्णवने ब्रेक दाबण्याऐवजी कारचे एक्सलेटर दाबले. त्यामुळे कार भरधाव वेगाने पुढे जावून ती रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार आदळली व पलटी झाली. या अपघातात दर्श जैन हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर अन्य चौघेजण जखमी झाले. या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version