तळोजातील खड्ड्यात तरुणाचा बळी

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. जुलै महिन्यात झालेल्या अपघातामध्ये तरुणाच्या हातावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याची घटना ताजी असताना तळोजातील सीईटीपी प्रकल्पाशेजारी गतिरोधकालगत असणाऱ्या खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमावण्याची वेळ आली.

तळोजा येथील सीईटीपीसमोरून ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे राहणारे विवेक तिवारी (36) हे रोडपाली येथे दुचाकीने जात असताना डंपरने भरधाव धडक दिल्यामुळे विवेक यांचा पाय डंपरच्या चाकाखाली आला. विवेक यांच्या मांडीला जबर दुखापत झाल्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी नितिन भोसले यांनी त्यांना नजीकच्या आनंद रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने रुग्णवाहिकेने त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. अखेर एमजीएम रुग्णालयात विवेक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दरम्यान घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक पोलिसांना तपास सुरू केला. डंपरचालक हिरालाल यादव याला या प्रकरणी ताब्यात घेतल्यावर तळोजा पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर खड्यामुळे दुचाकी चालक अचानक समोर आल्याने अपघात घडल्याचे डंपर चालक हिरालाल याने पोलिसांना सांगीतले. पोलीस उपनिरीक्षक  उमेश गुठाळ हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. विवेक हे खासगी कंपनीत नोकरी करतात. तळोजा पोलीस ठाण्यात या प्रकरणी  डंपरचालक हिरालाल यादव याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

Exit mobile version