मासेमारी करताना युवकाचा बुडून मृत्यू

| आगरदांडा | वार्ताहर |

उसरोली हद्दीत खारीकवाडा परिसरात तलावात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या आदिवासीचा चिखलात पाय रुतल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (दि.11) सकाळी घडली. संतोष सखाराम वाघमारे (वय 45, रा. नागेश्‍वरनगर -नांदगाव) असे त्याचे नाव आहे.

तलावामध्ये तीन आदिवासी तरुण मासे पकडण्यासाठी उतरले होते. यातील दोघे तलावात उतरून मासे पकडण्यासाठी जाळे टाकत होते. परंतु यातील संतोष वाघमारे हे तलावातील पाण्याच्यावर येत नसल्याने दोघा साथीदारांची चिंता वाढली. यातील एकाने त्यांना खोल पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते दिसले नाहीत. तद्नंतर चांगले पोहणारे असणार्‍या लोकांनी तलावात उड्या मारून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पाय चिखलात खोलवर रुतल्याने त्यांना पाण्याच्या बाहेर येता आले नाही. सर्वांनी त्यांना पाण्याच्या वर काढले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शव शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Exit mobile version