पन्हेळी येथे युवा शेतकर्‍यांचा उपक्रम

वनराई बंधार्‍याने फुलविला भाजीमळा

| तळा | श्रीकांत नांदगावकर |

वनराई बंधार्‍याच्या माध्यमातून पन्हेळी, ता.तळा येथे भाजीमळा फुलवून आर्थिक उन्नती साधण्यात तळा तालुका कृषी विभागाला यश आले आहे.

मौजे पन्हेळी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या मदतीने एकूण पाच वनराई बंधारे बांधले. यामुळे शेतीसाठी सिंचनाची सोय तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील मिटला आहे. वनराई बंधार्‍यांमुळे एप्रिल- मे महिन्यापर्यंत पाणीसाठा देखील उपलब्ध होणार आहे.

येथील रमेश महादेव शिंदे व महेश लक्ष्मण चोरगे या दोघा युवा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन 4.5 एकर क्षेत्रावर कलिंगड लागवडीचा प्रयोग केला आहे. दोघेही लॉकडाऊन पासून मुंबईहून गावी परत येऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. चालू वर्षी कलिंगड पिकाची 7500 रोपे तसेच कृषी विभागाच्या आत्मा योजने अंतर्गत मिरची, टोमॅटो व वांगी पिकाची प्रत्येकी 500 प्रमाणे 1500 रोपांची लागवड त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत सव्वा ते दीड लाखाचा खर्च केला आहे. कलिंगड पिकांमधून त्यांना 60 ते 70 टन इतक्या उत्पादनाचे अपेक्षा असून खर्च वजा जाता 4 ते 5 लाख पर्यंत निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे.

भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी कृषी सहाय्यक श्री दिनेश चांदोरकर व कृषी विभागाचे इतर अधिकारी यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते आहे. तळा तालुक्याच्या विविध भागांत वनराई बंधारा बांधण्यास वाव असून इच्छुक ग्रामस्थांनी कृषी विभागाशी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

चौकट
24 बंधार्‍याची निर्मिती
चालू वर्षी तळा तालुक्याचे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढवणे हा उद्देश ठेवून लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. त्यासाठी गेल इंडिया लिमिटेड यांचे सीएसआर फंडा मधून 6000 सिमेंट गोणी व 3000 स्थानिक खरेदी अशा एकूण 9000 रिकाम्या सिमेंट गोण्यांचे तालुक्यातील विविध गावांना मागणीनुसार वाटप करण्यात आले. गावातील स्थानिक शेतकरी तसेच जी.एम वेदक कॉलेज व द.ग. तटकरे कॉलेज येथील एन एस एस चे विद्यार्थी यांचे माध्यमातून आतापर्यंत 24 वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत

Exit mobile version