रोह्यातील तरुणांची जिगरबाज कामगिरी

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची केली सुटका

| रोहा | प्रतिनिधी |

दिवसा किंवा रात्री-अपरात्री वणवा लागणे, कंपनी, गावं, वाडी वस्तीवर आग लागणे, मनुष्य किंवा प्राणी पाण्यात बुडत असताना जीव वाचविण्यासाठी धडपड करणे इत्यादी प्रकारची नैसर्गिक आपत्ती अडकणाऱ्या किंवा कुणावर बाका प्रसंगी अथवा अडचण निर्माण होते, अशावेळी सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना पाचरण केले जाते. या संस्थेचे कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून प्रसंगी जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी समजून आपले कर्तव्य पार पडतात. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असताना गुरुवारी रोह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी सोडण्याचे काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना दिसत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्ध, महिला, शालेय विद्यार्थी, नोकर वर्ग आणि सामान्य रोहेकर जनतेने त्यांना धन्यवाद देत आशीर्वाद दिले आहेत.

रोहा तालुक्यात सलग दोन-तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीने गुरुवारी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे अष्टमी, धाटाव, गोवे, शिरवली आदी भागात पुराचे पाणी शिरले होते. कुंडलिका नदीच्या अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्याने अष्टमी गावाचा संपर्क तुटला होता. अशा परिस्थितीत अष्टमी नाक्यापासून रेल्वे स्टेशन फाट्यापर्यंत असलेल्या मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. मुख्य रस्त्यावर पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूला वाहने उभी होती. एकंदरीत वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक अडकल्याची गोष्टी लक्षात येताच निसर्ग वन्यजीव संरक्षण संस्था रायगड या टीमने पुढाकार घेऊन सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही टीम काम करत होती. पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक लोकांना टीमचे सदस्य दुसऱ्या बाजुला सोडण्यात मदत केली. तसेच लहान मुलांना आपल्या खांद्यावर घेऊन दुसऱ्या बाजूला सुखरूप सोडण्यात आले. संस्थेतील प्रथमेश कोळी, दत्ताराम वाघमारे, तेजस बोथरे, विघ्नेश वाघमारे, वसंत डोळकर, अमय कराळे, लवेश वाघमारे, दीपक कोल्हटकर,करणं कराले, ओमकार हजारे, हर्षद भोकटे, कुणाल माळुंजकर, सनी जाधव, ऋग्वेद भोकटे, आशिष धुमाळ, प्राची सिन्हा दिक्षा पावले, जागृती सुर्वे, ऋतिक शिंदे, हेमांगी वाघमारे पायल लाड या टीमच्या सदस्यांनी जिबरबाज काम केले.

Exit mobile version