। अमरावती । प्रतिनिधी ।
भरदिवसा युवकाची चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.22) सकाळच्या सुमारास घडली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेतील मृत तरुण रोहित रतन पाल (19) हा शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शोभा नगर परिसरातील एका पानटपरीजवळ मित्रासोबत बोलत उभा होता. त्याचवेळी तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी अचानकपणे रोहितवर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे. तसेच, जुन्या वैमनस्यातून रोहितची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.