रत्नागिरी येथे युवा सेनेची बैठक

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

युवक हा खर्‍या अर्थाने राजकारणाचा पाया आहे. या पायावरच आपली संघटना मजबूत आहे. येथील युवा सेनेची ताकद सर्वांना सर्वश्रुत आहे. आता दुप्पट ताकदीने आपण परिवर्तन करण्यासाठी सज्ज व्हा आणि गद्दारी गाढून खुद्दारीचा भगवा रत्नागिरी विधानसभेवर फडकवूया, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी युवा सेना बैठकीत केले.

शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या अभ्युदय नगर येथील संपर्क कार्यालयामध्ये नुकतीच युवा सेनेची बैठक झाली. त्यावेळी बाळ माने बोलत होते. यापूर्वी माने यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आदींसह सर्व पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. तसेच महिला आघाडी आणि पाठोपाठ युवा सेनेचीही बैठक घेण्यात आली.

या बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, उपतालुका प्रमुख आशिष भालेकर, संदेश नारगुडे, शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, विराज माने यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, विभाग समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि उप शाखा प्रमुख यांच्यासह कॉलेज युनिटचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. युवकांच्या ताकदीवर ही निवडणूक यशस्वीपणे जिंकू शकतो, असा विश्‍वास यावेळी सर्व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

Exit mobile version