उपायुक्त मकरंद देशमुख यांचे प्रतिपादन
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
आदरातिथ्य आणि पर्यटन विषयक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने पाहावे आणि सहभागी व्हावे. तुम्ही सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी आणि उत्साही सेवा देऊ शकाल, असे प्रतिपादन कोकण विभागाचे उपायुक्त मकरंद देशमुख यांनी व्यक्त केला.
पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग आणि डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज, नेरुळ येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, संजय नाईक, पल्लवी चौधरी, आरती पंदिरकर, प्रविण डोंगरदिवे, रुपाली राणे आणि आदरातिथ्य व पर्यटन विषयीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थी उपस्थित होते.