तरुणांनी व्यसनापासून दूर रहाः सोमनाथ घार्गे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पालक वर्ग नोकरी व्यवसायात मग्न असल्याने मुलांना एकटेपणा निर्माण होतो. त्याचा फायदा घेत काही मंडळी त्या मुलांना अमिष दाखवून व्यसन करण्यामध्ये गुंतवित असतात. यामुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जाण्याची भिती अधिक आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर रहा, असा मोलाचा सल्ला पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला. सीमाशुल्क सागरी तथा निवारण मंडळ कार्यालय अलिबाग यांच्यावतीने अलिबागमधील पीएनपी एज्युकेशन सेंटरमधील सभागृहात बुधवारी (दि.26) नशा मुक्त पंधरवडा समारोप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सीमा शुल्क विभागाचे उपआयुक्त पंकज झा, पीएनपी पोर्ट ऑफीसर मनोज ओझा, पीएनपी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख पल्लवी पाटील, पीएनपी, दिघी पोर्टचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना व्यसनाच्या आहारी गुंतवून त्यांना बिघडविण्याचा काही मंडळी प्रयत्न करतात. समाजासाठी ही मंडळी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तरुणांनी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला सुरु असलेल्या गैर प्रकारापासून दुर राहण्याबरोबरच पोलीसांनादेखील याची माहिती देऊन सहकार्य करावे. युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. पोलीस म्हणून आम्ही लक्ष देत आहोत, मात्र पालकांनीदेखील मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम करावे, असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

Exit mobile version