| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली-शिलफाटा येथे दोन दिवसांपूर्वी ईदनिमित्त येथील हॉटेलाना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही लाईट काढण्यासाठी येथील तरुण कामगार विजेच्या खांबावर चढला असता त्याला उच्चदाबाच्या लाईनचा जबर शॉक लागला होता. त्यात त्याला मोठी दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान दोन दिवसांनंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने शिलफाटा परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिलफाटा पटेल नगर येथील तरुण योगेश (उर्फ साहिल) लक्ष्मण सावरकर हा घरची हलाकीची परिस्थिती असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करीत असे. शिलफाटा परिसरात ईदनिमित्ताने हॉटेलाना विद्युत रोषणाई केली होती. ती मंगळवारी काढण्याचे काम करीत असताना येथील विजेच्या खांबावर चढला असताना अचानक त्याला उच्चदाबाच्या लाईनचा जबर शॉक लागून तो खाली पडला. त्यात त्याला मार लागला. त्याला तात्काळ उपचारासाठी रबाळे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी सायन रुग्णालयात नेले असता उपचार सुरू असताना शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.