टपरीवरील चमचमीत खाण्याने पालकांच्या चिंतेत भर; ‘जिभेचे चोचले की आरोग्याचा बट्ट्याबोळ?’
| उरण | प्रतिनिधी |
घरात आईने प्रेमाने बनवलेले गरमागरम, पौष्टिक जेवण नको आणि रस्त्याच्याकडेला असलेल्या चायनीजच्या गाड्या, टपऱ्या अन् फास्ट फूड सेंटरवर ताव मारायचा, अशी विचित्र फॅशन सध्या तरुणाईत बोकाळली आहे. जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात आरोग्याची मात्र, अक्षरशः वाट लागण्याची भीती निर्माण झाली असून, मुलांच्या या सवयीने पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
दिवसभर उन्हातान्हात राबायचे, घाम गाळायचा, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवायच्या आणि मुलांच्या हातात पैसे द्यायचे. मुलांनी चांगले खावे, शिकावे आणि आयुष्यात मोठे व्हावे, ही आई-वडिलांची अपेक्षा. मात्र, हातात पडलेला पैसा पौष्टिक अन्नाऐवजी चायनीज, बर्गर, पिझ्झा, थंडपेये आणि आईस्क्रीमवर उधळला जात असल्याची खंत अनेक पालक व्यक्त करीत आहेत.
घरात आई जेवण वाढून मुलाची वाट पाहत बसते; पण साहेब बाहेरच पोट भरून घरी येतात! आईच्या हातच्या जेवणाला नकार आणि टपरीवरील खाण्याला होकार, या उलट्या संस्कृतीने पालकही हैराण झाले आहेत. ‘आम्ही राबायचे कुणासाठी?’ हा पालकांचा सवाल आता संतापात बदलू लागला आहे. उघड्यावर तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची स्वच्छता, वापरलेले तेल, पाण्याची गुणवत्ता, खाद्यपदार्थांची साठवणूक आणि हाताळणी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अन्नसुरक्षा नियमांचे पालन न झाल्यास दूषित अन्नामुळे विविध आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केवळ ग्राहकांनी सावध राहणे पुरेसे नाही, तर संबंधित यंत्रणांनीही खाद्यविक्रेत्यांच्या स्वच्छतेची नियमित तपासणी करण्याची गरज आहे. चटकदार खाण्याची सवय आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढणे आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. त्यात थंडपेयांचा आणि अतिसाखरयुक्त पदार्थांचा अतिरेक झाला तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मोबाईल एका हातात, चायनीजची प्लेट दुसऱ्या हातात आणि मैदान मात्र ओसाड, असे चित्र बदलत्या जीवनशैलीचे विदारक वास्तव दाखवत आहे. आजच्या तरुणाईने जिभेपेक्षा आरोग्याला महत्त्व देण्याची वेळ आली आहे. मैदानी खेळ, व्यायाम, घरचे ताजे अन्न आणि संतुलित आहार याकडे पुन्हा वळण्याची गरज आहे. पालकांनीही मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. प्रशासनानेही आता केवळ पाहत बसण्याची भूमिका सोडावी. शहरातील चायनीज गाड्या, फास्ट फूड सेंटर आणि उघड्यावरील खाद्यविक्री केंद्रांची नियमित तपासणी करावी. स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी, तेल, कच्चा माल आणि स्वच्छतेची स्थिती तपासावी.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी
नियम मोडणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन सोडण्याऐवजी कायद्यानुसार ठोस कारवाई करावी. जिभेच्या चोचल्यासाठी आरोग्याची किंमत मोजायची का? हा प्रश्न आता प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आजची चटक उद्याचा आजार ठरू नये, एवढीच अपेक्षा आहे.







