अजित पवारांचे टेन्शन वाढले
| बारामती | वृत्तसंस्था |
बारामतीतील काका-पुतण्याचे बंड अवघ्या देशाने पाहिले. याच बंडाचा दुसरा अध्याय आता बारामतीत घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेत पुतणे अजित पवार यांनी पक्ष मिळवला. त्याच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आता बारामतीत अॅक्टिव्ह झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत आता अजित पवार व युगेंद्र पवार अशी काका-पुतण्याची लढाई बारामतीकरांना पाहायला मिळेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार, सुनेत्रा पवार व त्यांची पार्थ व जय ही दोन मुले एकीकडे तर उर्वरित पवार कुटुंब एकीकडे अशी स्थिती बारामतीत पाहायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत येथे नणंद-भावजय असा सामना रंगला. त्यात दोन्ही पवारांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. अजित पवार यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांना लक्ष्य केले. दुसर्या बाजूनं आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर थेट हल्ला चढवला. बारामतीचा विकास मीच केला, असे सांगणार्या अजित पवार यांना युगेंद्र यांनी प्रत्युत्तर देत बारामतीत महत्त्वाच्या संस्था, एमआयडीसी शरद पवार यांच्यामुळे उभी राहिल्याचं सांगितलं. युगेंद्र यांचा कामाचा धडाका सुरु असून, आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. दुसरीकडे अजित पवार गट 4 जूनच्या निकालाची वाट पाहात आहे. या निकालावरच अजित पवार गटाची पुढील व्यूहरचना अवलंबून असेल.