। पनवेल । वार्ताहर ।
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी नातं सांगणार्या रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील युसुफ मेहरअली सेंटर या समाजवादी विचारसरणीतून प्रेरीत होवून सुरू झालेल्या संस्थेला यावर्षी 60 वर्षे पुर्ण होत आहेत. कर्नांळा अभयारण्याच्या कुशीत राष्ट्रपिता गांधींचा खेड्याकडे चला हा संदेश घेवून ग्रामीण विकासाचे स्वप्न घेवून काम करणारे सेंटरचा हिरक महोत्सव साजरा केला जाणार आहे. 30 एप्रिल रोजी होणार्या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाजवादी विचार बळकट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले. सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. जी. पारीख यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अध्यक्ष उषा शहा, उपाध्यक्ष हरेश शहा, मधु मोहिते, नितीन अणेराव, जगदिश तिरोडकर आणि संतोष ठाकूर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेल्या तारा गावात 60 वर्षांपुर्वी म्हणजे 1962 साली संस्थेच्या कार्याला सुरूवात केली. गांधीजींच्या प्रेरणेतून काम करणार्या नऊ ऑगस्ट च्या ’चले जाओ’ आंदोलनाचे नेते आणि मुंबईचे सर्वात तरुण महापौर म्हणून ओळख असलेल्या युसूफ मेहरअली यांचे नाव देवून संस्थेने विविध उपक्रम राबविले. रायगड जिल्ह्यातील आदिवासींची वेठबिगारी थांबवून ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्याच्या कामातून पुढे शिक्षण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, डी.बी.आर.टी कोर्स, महिला बचत गट, बायोगँस निर्मिती, सेंद्रीय साबण, दुध डेअरी, सेंद्रीय शेती आदी प्रयोग राबवून संस्थेचे काम देशातील तामिळनाडू, जम्मू कश्मीर, उत्तराखंड, बिहार, उत्तरप्रदेश ओरिसा, मध्यप्रदेश आदी राज्यांपर्यंत पोहचले आहे.
यावेळी मधू-प्रमिला दंडवते, पालकमंत्री आदिती तटकरे, सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर, खा. बारणे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, हुसैन दलवाई, तुषार गांधी, इरफान इंजिनियर आदी उपस्थित राहणार आहेत
युसूफ मेहरअली सेंटरचे 60 व्या वर्षांत पदार्पण
