| बर्मिंगहॅम | वृत्तसंस्था |
बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या ‘वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स’ लीगमध्ये भारतीय चॅम्पियन्सचा कर्णधार असलेल्या युवराज सिंगने शुक्रवारी रात्री ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केवळ 28 चेंडूत पाच षटकारांच्या मदतीने 59 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान युवीच्या बॅटमधून चार शानदार चौकारही आले. युवराजची ही खेळी पाहून चाहत्यांना 2007 च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धची 30 चेंडूत 70 धावांची खेळी आठवली. आजही तीच गोष्ट 42 वर्षांच्या युवराजात दिसते, जी 15 वर्षांपूर्वी दिसली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारत प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंना केवळ 168 धावा करता आल्या. इंडिया चॅम्पियन्ससाठी युवराज सिंगने अवघ्या 28 चेंडूत 59 धावा केल्या. इरफान पठाणने 19 चेंडूत 50 धावा, युसूफ पठाणने 23 चेंडूत 51 धावा आणि रॉबिन उथप्पाने 35 चेंडूत 65 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत धवल कुलकर्णी आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांना प्रत्येकी एक यश मिळाले. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर युवराज सिंगच्या भारतीय संघाने चॅम्पियन्सच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.