सुधागडमध्ये निवडणुकीची चाहूल

जांभुळपाडा जि.प. गट उमेदवारीवर रंगली चर्चा

| सुधागड | प्रतिनिधी |

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सुधागड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्या गटाची कोणत्या प्रभागात आघाडी होणार, कोणत्या युती जुळणार, याकडे आता सुधागडवासियांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून, काहींनी पक्षांतर्गत बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. सुधागड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण उमेदवारी करणार, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः जांभुळपाडा जिल्हा परिषद गटात कोणत्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरणार, यावरून राजकीय वर्तुळात खलबते सुरू आहेत.

स्थानिक राजकारणात एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे तो म्हणजे कार्यकर्त्यांची भूमिका. तालुक्यातील कार्यकर्ते केवळ प्रचारापुरते मर्यादित राहणार की त्यांना खऱ्या अर्थाने नेतृत्वाची संधी मिळणार, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित होत आहे. दरम्यान, जांभुळपाडा जिल्हा परिषद विभागाची निवडणूक यंदा सुधागड तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. या विभागात कोण उमेदवार म्हणून उतरतो, कोणाला संधी मिळते आणि कोणती गटबाजी प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या निवडणूक अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसली तरी तालुक्यातील राजकीय हालचालींनी गती घेतली असून, निवडणुकीचे वातावरण तयार होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

Exit mobile version