जि.प. पंचायत समितीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाची हालचाल सुरू झाली असून सोमवारी (दि.13) अलिबागसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण दुपारी बारा वाजता अलिबागमध्ये, तर पंचायत समितीचे आरक्षण सकाळी अकरा वाजता प्रत्येक तालुक्यात होणार आहे. कोणत्या गणात आणि गटात काय आरक्षण पडणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या आरक्षणाकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले. सदस्य पदाचे आरक्षण कधी जाहीर होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. अनेकांनी आपआपल्या मतदार संघात मोर्चे बांधणी अगोदरपासूनच सुुरू केली आहे. काहींनी जाहीरात बाजी करून आपणच या मतदार संघाचे उमेदवार असा दिखावादेखील केला आहे. त्यामुळे सदस्यपदाच्या आरक्षणानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास वर्ग आणि स्त्रियांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागा आरक्षणासबंधीची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया एकाच दिवशी सोमवारी (दि.13) सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची बैठक दुपारी दोन वाजता होमार आहे. अलिबागमधील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही प्रक्रीया राबविली जाणार आहे. पंचायत समितीचे आरक्षण सकाळी अकरा वाजता सुरु होणार आहे. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फळके नाट्यगृह, कर्जतमधील प्रशासकीय भवन, तहसलिदार कार्यालय, खालापूरमधील पंचायत समिती, छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सुधागडमधील श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली भक्त निवास, क्र.एक सभागृह,पेणमधील उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह, अलिबागमधील नगरपरिषद सभागृह, मुरुडमधील पंचायत समिती येथील सभागृह, रोहामधील नगरपरिषद ज्येष्ठ नागरिक सभागृह, तळामधील पंचायत समिती येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, माणगावमधील तहसील कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय भवन, म्हसळामधील पंचायत समिती सभागृह, श्रीवर्धनमधील तहसीलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील बहुउद्देशीय हॉल, पोलादपूरमधील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. हे आरक्षण चक्री पध्दतीने होणार आहे. त्यामुळे सदस्य पदासाठी बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





