| रायगड | प्रतिनिधी |
दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा सुरू आहेत. काही शाळांच्या परीक्षा सुरूही झाल्या आहेत. 15 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतील. त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील. 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे.
शैक्षणिक वर्षात 52 रविवारी शाळांना सुट्टी असते. याशिवाय शाळांना सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने अशा 76 सार्वजनिक सुट्ट्यादेखील असतात. शैक्षणिक वर्षातील राहिलेल्या 237 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन होते. दरम्यान, यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना 12 दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे.
शैक्षणिक वर्षाच्या शेवटी 2 मे ते 13 जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुट्ट्या असतील. तत्पूर्वी, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील.दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा उरकल्या जायच्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सुट्ट्या लागायच्या. म्हणजेच परीक्षा संपल्याने विद्यार्थी शाळेत येत नसत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्यात बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाचवेळी सुरू होईल, असे आदेश काढले. जेणेकरून शैक्षणिक वर्षातील किमान 220 दिवस तरी विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे हा त्यामागील हेतू आहे.
28 ऑक्टोबरपासून सुरू होतील शाळा
दिवाळीपूर्वीची प्रथम सत्र परीक्षा आजपासून (दि.10) सुरू होईल. 15 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा संपतील. त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून शाळांना तथा विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील. 28 ऑक्टोबरपासून पुन्हा शाळा सुरू होतील.
दिवाळीनंतर शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी
दिवाळीनंतर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत राज्यभरातील जिल्हा परिषदांसह पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. त्यासाठी मनुष्यबळ खूप लागणार आहे. त्यामुळे दोन्ही टप्प्यात शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत.







