22 मुलांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग
। छिंदवाडा । वृत्तसंस्था ।
मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतूल आणि पांढुर्णा येथील विषारी कफ सीरप प्रकरणात 22 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. मध्य प्रदेशचे ड्रग कंट्रोलर दिनेश श्रीवास्तव यांनी बॅन कफ सीरप स्टॉकची सीझ करण्याची कारवाई सुरु असल्याचं सांगितलं.
श्रीवास्तव म्हणाले की, राज्यात कफ सीरपचं उत्पादन करणाऱ्या 30 कंपन्यांच्या तपासणीसाठी केंद्र सरकराला पत्र पाठवण्यात आलं आहे. एसआयटीकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दोषी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात 10 हजार कोटींचा औषधांचा व्यवसाय आहे. त्यासाटी केवळ 70 ड्रग इन्स्पेक्टर आहेत. आता नवीन एसओपी तयार केली जात आहे, त्यामुळे संशयास्पद सॅम्पल थेट प्रयोगशाळेत पोहोचेल आणि 24 तासांच्या आत त्याचा रिपोर्ट येईल.
ड्रग कंट्रोलर श्रीवास्तव पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशात बनलेल्या साधारण 30 कफ सीरप उत्पादकांची तपासणी केंद्र सरकारच्या सहकार्याने होणार आहे. त्यासाठी केंद्राला पत्र पाठवण्यात आलं असून परवानगी मिळताच या सर्व सीरपची तपासणी सुरु होईल. नागपूरहून मिळालेल्या अलर्टनंतर ज्या अधिकाऱ्यांनी सॅम्पल परीक्षणात दिरंगाई केली, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
केवळ तीन लॅब तपासणीसाठी
राज्यासमोर आता सर्वात मोठं संकट हे औषधांची गुणवत्ता तपासणं आहे. 10 हजार कोटींच्या या मार्केटमध्ये केवळ 79 ड्रग इन्स्पेक्टर आहेत. तर नमुन्यांच्या तपासणीसाठी केवळ तीन प्रयोगशाळा आहेत. त्यात फक्त भोपाळची प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सुरु आहे. याच दूरवस्थेमुळे विषारी कफ सीरपचं प्रकरण घडलं. मध्य प्रदेश, नागपूर आणि पांढुर्णासह अनेक जिल्ह्यात आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू झाला आहे. यात कोल्ड्रिफ, रीलाइफ आणि रेस्पिफ्रेस टीआर या दूषित औषधांचं कारण ठरलं आहे.







