नूतनीकरणावर खर्च न करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे आदेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्याच्या प्रशासकीय कामाचा गाडा हाकणार्या अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाल्यानंतर सदर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याची बाब स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोर आली आहे. त्यामुळे या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालये रिकामी करुन इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने इतरत्र जागांवर कार्यालये हलविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढील काळात इमारतीमधील दालनांच्या सुशोभिकरणावर खर्च करु नये, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी कल्पनेतून सन 1978 साली रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. 1982 साली ही इमारत बांधून तयार झाली होती. जिल्हा परिषदेचा कारभार एकाच इमारतीतून चालावा आणि सर्व विभाग एकाच इमारतीत कार्यरत असावेत, यासाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांनी ही इमारत बांधून घेतली होती.
जिल्ह्यातील देखणी इमारत असणार्या या तीन मजली इमारतीच्या बाहेर शिवकालीन शिल्पे साकारण्यात आली होती. तेव्हापासून जवळपास 38 वर्षे या इमारतीतून जिल्हा परिषदेचा कारभार चालविला जात आहे. मात्र, समुद्राची खारी हवा आणि इतक्या वर्षांनंतर आता या इमारत कालापरत्वे जीर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी इमारतीची पाहणी केली. यानंतर इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचा अंतरिम अहवाल त्यांनी प्रशासनाला सादर केला आहे.
काय आहे अहवाल
इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल 11 नोव्हेंबर 2021 ला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त झाला आहे. या अहवालात जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जुनी झाली असून, शासकीय काम करण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही विभागाचे किंवा पदाधिकारी यांच्या दालनाचे नूतनीकरण किंवा सुशोभिकरण करू नये, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.
कार्यालयांचे होणार स्थलांतरण
विस्तारीत चौथ्या मजल्यावर सभागृह तसेच विविध कार्यालये आहेत. मात्र, खबरदारीच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यालये येथून हलवून इतरत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने अलिबाग पंचायत समीती, संघटना सदन तसेच कुंटे वाडी येथे सुरु करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यादृष्टीने हालचालदेखील सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर या कार्यालयांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







