जिल्हा परिषदेत 52 लाखांच्या वाहनखर्चाला हिरवा झेंडा

कंत्राटदारांना ठेंगा; ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची तिसऱ्यांदा ई-निविदा
जुन्या कंत्राटदारांची देयके रखडल्याचा संजय सावंत यांचा आरोप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी वाहनसेवा पुरविणाऱ्या कंत्राटदारांची लाखो रुपयांची देयके थकीत असल्याचा आरोप होत असतानाच, विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी चारचाकी वाहने भाडेतत्त्वावर घेण्याकरिता तब्बल 51 लाख 91 हजार 995 रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, या निविदेवर स्पष्टपणे ‌‘तिसरे बोलावणे‌’ असा उल्लेख असल्याने या प्रक्रियेला यापूर्वी अपेक्षित प्रतिसाद मिळाला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काम करूनही वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे वाहन पुरवठादार आणि कंत्राटदार या प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी केला आहे. जुन्या कंत्राटदारांची देयके प्रलंबित असताना नव्याने वाहनसेवेवर एवढा मोठा खर्च करण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सादील 5 टक्के खर्चातून अंतर्गत उपविभागांसाठी चारचाकी वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. ही सेवा 11 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार असून, निविदेची अंदाजित रक्कम 51 लाख 91 हजार 995 रुपये आहे. निविदा सूचना क्रमांक 73 अंतर्गत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निविदेच्या वेळापत्रकानुसार 25 नोव्हेंबर 2026 पासून 2 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन निविदा सादर करता येणार आहेत. तर 3 डिसेंबर 2026 रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. ही निविदा तिसऱ्यांदा प्रसिद्ध करण्यात आल्याचेही सूचनेत नमूद आहे.

सरकारी वाहने असताना भाड्याच्या वाहनांची गरज का?
जिल्हा परिषदेकडे तसेच संबंधित विभागांकडे शासकीय वाहने उपलब्ध असताना पुन्हा खासगी वाहने भाड्याने घेण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. जलजीवन मिशनच्या कामांबाबत जिल्ह्यात अनेक ठिकाणी तक्रारी आणि अपूर्ण कामांचे प्रश्न कायम असताना, नागरिकांना पाणीपुरवठा सुधारण्यासाठी निधी वापरण्याऐवजी वाहनांवर लाखोंचा खर्च कशासाठी, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
थकीत देयकांचा प्रश्न ऐरणीवर
यापूर्वी वाहनसेवा पुरविणाऱ्या कंत्राटदारांची आणि संबंधित पुरवठादारांची देयके अद्याप प्रलंबित असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. या देयकांबाबत विभागाने कोणती कार्यवाही केली, किती रक्कम थकीत आहे आणि ती कधी अदा केली जाणार, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासनाने खर्चाचा हिशोब द्यावा
जलजीवन मिशनच्या निधीतून वाहन भाड्यापोटी होणाऱ्या खर्चाची आवश्यकता, उपलब्ध शासकीय वाहनांची संख्या, प्रस्तावित वाहनांचा प्रत्यक्ष वापर आणि मागील कंत्राटदारांची थकीत देयके याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी संजय गंगाराम सावंत यांनी केली आहे. दरम्यान, या निविदेबाबत प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि जुन्या कंत्राटदारांच्या थकीत देयकांची वस्तुस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या प्रश्नांवर काय स्पष्टीकरण देतो, याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.
Exit mobile version