जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची फेब्रुवारीत परीक्षा

वर्षानुवर्षे खुर्चीला चिकटून बसलेल्यांना धास्ती

| रायगड | प्रतिनिधी |

परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली, पण दैनंदिन कामकाज करताना अनेकदा कर्मचाऱ्यांना बऱ्याच बाबींची माहिती नसल्याने अधिकाऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा अंदाज घेऊन त्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी, प्रशासन गतिमान व्हावे म्हणून जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांमधील 57 कर्मचाऱ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने आता तयारी सुरू केली असून फेब्रुवारीत ही परीक्षा होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये सध्या मनुष्यबळ खूपच कमी आहे. कमी मनुष्यबळावर सध्या प्रशासकराज सुरू आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध मनुष्यबळावर प्रशासन गतिमान करून सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या हेतूने प्रत्येक कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, शिक्षण, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा हे विभाग सामान्यांसाठी निगडित आहेत. या विभागाकडील फाईलींचा निपटारा तत्काळ व्हावा, वरिष्ठांच्या पत्रव्यवहारानुसार वेळेत काम व्हावे अशी या परीक्षेमागील भूमिका आहे. तत्पूर्वी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षणानंतर सर्वच कर्मचारी परीक्षेसाठी तयार असल्याची स्थिती आहे.

एकाच टेबलावर ठाण मांडलेल्यांना धास्ती
जिल्हा परिषदेवर मार्च 2022 पासून प्रशासकराज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे आता पुढील मार्चपर्यंत (2024) प्रशासकच राहणारआहे. दुसरीकडे शासनाकडून अजूनपर्यंत जिल्हा परिषदांमधील सर्व रिक्त पदांची भरती केलेली नाही. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे तीन-चार विभागांचा तथा टेबलांचा पदभार आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांना खूपच काम करावे लागत आहे, तर ज्यांना काम जमत नाही किंवा उरकत नाही त्यांना काहीच काम नाही असा विरोधाभास आहे. त्यापैकी अनेकजण संघटनेच्या माध्यमातून किंवा राजकीय दबावातून वर्षानुवर्षे एकाच टेबलाला चिकटून बसल्याचे बोलले जाते. त्यांना ही परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे, अन्यथा त्यांची उचलबांगडी अटळ मानली जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या परीक्षेचे 3 पर्याय
1) संगणक हताळता येतो का व टायपिंग येते का? याची देखील परीक्षा होईल
2) लेखी परीक्षेत दैनंदिन कामकाजाचे मुद्दे असणार; पत्रव्यवहार कसा करायचा, पत्राचा फॉन्ट असेही मुद्दे असणार
3) ओपन बुक परीक्षा घेण्याचाही विचार; त्याच प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्नही असणार
Exit mobile version