झिम्बाब्वेने केले बांगलादेशला चितपट

| ढाका | वृत्तसंस्था |

झिम्बाब्वेने अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या झिम्बाब्वेने यजमान संघाविरोधात पाच ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळली. सुरुवातीचे चारही सामने गमावल्यानंतर झिम्बाब्वेसमोर क्लीन स्वीपचा धोका होता. पण, अखेरच्या सामन्यातील विजयाने पाहुण्या संघाने शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर दिले. अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेने 8 गडी राखून विजय साकारला.

खरे तर या सामन्यापूर्वी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीबने एक मोठे विधान केले होते. त्यामुळे आता झिम्बाब्वेने विजयासह शाकीबला प्रत्युत्तर दिल्याचे दिसते. 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. विश्वचषकाला अनुसरून शाकिब अल हसन म्हणाला होता की, बांगलादेश विश्वचषकासाठी अद्याप पूर्णपणे तयार नाही. आम्ही अव्वल संघांविरूद्ध कमकुवत आहोत. पण, आता विश्वचषकाच्या तोंडावर आम्ही झिम्बाब्वेचा दारूण पराभव केला आहे. अखेरचा सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे. अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 6 बाद 157 धावा केल्या. महमुदुल्लाहने संघासाठी सर्वाधिक धावा करताना 44 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावा केल्या.

याशिवाय संघाचे उर्वरित फलंदाज जवळपास फ्लॉप ठरले. यादरम्यान झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट आणि मुझाराबानी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 18.3 षटकांत केवळ 2 गडी गमावून सहज विजय मिळवला. झिम्बाब्वेचा शानदार विजय दरम्यान, बांगलादेशने दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पहिला धक्का बसला, यानंतर कर्णधार सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट यांनी दुसऱ्या बळीसाठी 75 धावांची भागीदारी केली. ही अप्रतिम भागीदारी 16व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संपुष्टात आली. बेनेट 49 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 70 धावा करून मोहम्मद सैफुद्दीनचा बळी ठरला. यानंतर कर्णधार रझा आणि जोनाथन कॅम्पबेल यांनी तिसऱ्या बळीसाठी 45 धावांची भागीदारी केली आणि विजयाकडे कूच केली. सिकंदर रझाने 46 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. झिम्बाब्वेने 18.3 षटकांत 2 बाद 158 धावा करून विजय साकारला.

Exit mobile version