विश्‍वचषक स्पर्धेतून झिम्बाब्वे बाद

| हरारे | वृत्तसंस्था |

विश्‍वकरंडक पात्रता फेरीच्या साखळी फेरीत वेस्ट इंडीजला पराभूत करणार्‍या झिम्बाब्वेला सुपर सिक्स लढतीत स्कॉटलंडकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे आता झिम्बाब्वेचे विश्‍वकरंडकाच्या मुख्य फेरीत पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. स्कॉटलंडला मात्र आता मुख्य फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे. सुपर सिक्समधील स्कॉटलंडची अखेरची लढत नेदरलँडविरुद्ध होणार आहे. या लढतीत मोठा पराभव टाळल्यास स्कॉटलंडला मुख्य फेरीत वाटचाल करता येणार आहे. स्कॉटलंडकडून झिम्बाब्वेसमोर 235 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. सिकंदर रझा (34 धावा), रायन बर्ल (83 धावा) आणि वेस्ली एम. (40 धावा) यांचा अपवाद वगळता झिम्बाब्वेच्या फलंदाजांना स्कॉटलंडच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावता आले नाही. झिम्बाब्वेचा डाव 203 धावांवरच संपुष्टात आला. ख्रिस सोल याने 33 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ब्रँडन मॅकमुलन व मायकेल लिस्क यांनी प्रत्येकी दोन मोहरे टिपले. याआधी स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 234 धावा उभारल्या. ख्रिस्तोफर मॅकब्राईड (28 धावा), मॅथ्यू क्रॉस (38 धावा), ब्रँडन मॅकमुलन (34 धावा), जॉर्ज मुंसी (31 धावा), मायकेल लिस्क (48 धावा) यांनी स्कॉटलंडसाठी मोलाच्या धावा उभारल्या. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने तीन, तर तेंदाई चताराने दोन विकेट घेतल्या.

सुपर सिक्समधील ताजा गुणतक्ता
1) श्रीलंका (8 गुण, 1.817 सरासरी). 2) स्कॉटलंड (6 गुण, 0.296 सरासरी). 3) झिम्बाब्वे (6 गुण, -0.099 सरासरी). 4) नेदरलँड (4 गुण, 0.042 सरासरी). 5) वेस्ट इंडीज (0 गुण, -0.510 सरासरी). 6) ओमान (0 गुण, -2.072)

Exit mobile version