पहिल्याच दिवशी धावांचा डोंगर; यशस्वी-गिलची शतकं
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याला शानदार सुरूवात करत पहिल्याच दिवशी चांगली धावसंख्या उभारत सामन्यात आपला दबदबा काय ठेवला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघाने चांगली सुरूवात करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या दिग्गजांच्या अनुपस्थितीत नवख्या भारतीय संघाचा इंग्लंडसमोर कसा निभाव लागणार असा सर्वांनाच प्रश्न होता. पण या नवख्या टीम इंडियाने लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 षटकांत 3 बाद 359 धावा केल्या आहेत.
भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी सलामीला उतरली. या दोघांनी संघाला चांगली सुरूवात करून देत 91 धावांची भागीदारी केली. पहिले सत्र संपायच्या काही मिनिट आधी केएल राहुल झेलबाद झाला आणि इंग्लंडला पहिली विकेट मिळाली. यानंतर भारताचा पदार्पणवीर साई सुदर्शन खातंही न उघडता झेलबाद झाला. पहिल्याच कसोटी त्याला भोपळाही फोडता नाही आला आणि लंचपर्यंत भारताने चांगल्या सुरूवातीनंतर 92 धावांवर दोन विकेट्स गमावले.
केएल राहुल 78 चेंडूत 8 चौकारांसह 42 धावा करत बाद झाला. ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर राहुल स्लिपमध्ये जो रूटकरवी झेलबाद झाला. यानंतर साई सुदर्शन भोपळा न फोडताच माघारी परतला. बेन स्टोक्सने सापळा रचत सुदर्शनला विकेटकिपर करवी बाद केलं. यानंतर आलेल्या शुबमन गिलने जैस्वालच्या साथीने डाव सांभाळला. दुसऱ्या सत्रात यशस्वी जैस्वालने विक्रमी शतक केलं. जैस्वाल 19 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकारासह 101 धावा करत बाद झाला. जैस्वालला बेन स्टोक्सने क्लीन बोल्ड करत बाद केलं.
जैस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार-उपकर्णधाराची जोडी मैदानात खेळत होती. गिलने चौकार लगावत कर्णधार म्हणून पहिलं कसोटी शतक झळकावलं. यानंतर उपकर्णधार ऋषभ पंतने चौकार-षटकारांच्या फटकेबाजीसह वादळी अर्धशतक पूर्ण केलं. सध्या 198 चेंडूत 138 धावांची भक्कम भागीदारी करत दोन्ही फलंदाज मैदानावर नाबाद आहेत. गिल 127 धावा ऋषभ पंत 65 धावा करत नाबाद परतले आहेत. कर्णधार-उपकर्णधाराची जोडी दुसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेत आहेत.
पावसाची शक्यता
ॲक्यूवेदरच्या अहवालानुसार, दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता 66 टक्के आहे. किमान तापमान 15 आणि कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. तिसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता 60 टक्के आहे. या दिवशी किमान तापमान 12 आणि कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. चौथ्या दिवशी चाहत्यांना जास्तीत जास्त क्रिकेट खेळ पाहायला मिळेल. पाचव्या दिवशी चाहत्यांना पुन्हा एकदा निराशा होऊ शकते. या दिवशी पावसाची शक्यता 64 टक्के आहे. या दिवशी किमान तापमान 14 आणि कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस असू शकते.