भाताचे बियाणे जमिनीतच कुजून गेल्याने संभ्रम
| नेरळ | प्रतिनिधी |
यावर्षी मोसमी पावसाचे गणित बिघडले असून सलग लागून राहणारा पाऊस यांमुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या शेतीची गणिते बिघडली आहेत. मे महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे जमिनीचा वाफसा नाहीसा झाला असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामाची शेती करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान, भाताची बियाणे यांची केलेली पेरणी ही सततच्या पावसामुळे भाताचे बियाणे कुजून गेली आहेत. दरम्यान, त्यासर्व बाबींमुळे भाताच्या शेतात रोपे तयार करण्यासाठी बियाणे आणायचे कुठून? या समस्येने शेतकऱ्यांना ग्रासले असून यावर्षीची खरीप हंगाम फुकट जाण्याची सर्वाधिक भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
अवकाळी आणि त्यानंतर मौसमी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे.मे महिन्यात पाऊस झाल्याने भाताची शेती करणारे शेतकऱ्यांना बियाणे उगवण्यासाठी जमिनीतील वाफसा मिळाला नाही. त्यामुळे भाताचे रोप तयार होण्यात अडचणी दिसून येत आहेत.
या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आला असून, खरीप हंगामातील भाताचे पीक यांची लागवड करण्यापासून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या या अडचणींचा विचार करून शेतकऱ्यांना मदत म्हणून भाताचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पाषाणे ग्रामपंचायतमधील शेतकरी सचिन शेळके यांनी केली आहे. भाताच्या शेतात अवकाळी पावसामुळे उगवलेले गावात काढण्यात अनेक अडचणी येत असून, त्यात शेतकऱ्यांचे अर्धे कष्ट वाया गेले आहेत. त्यानंतर सलग काही दिवस झालेल्या पावसामुळे भाताचे बियाणे उगवण्याच्या अडचणी येत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. नाहीतर खरीप हंगामात कर्जत तालुक्यात ज्या दहा हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते, ही शेती वाया जाण्याची शक्यता आहे.