| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत झिरवाळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
हा कथित व्हिडिओ त्यांच्या शासकीय निवासस्थानी चित्रित झाल्याचा दावा केला जात असून, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच तो अचानक व्हायरल झाल्याने विधानभवनातही चर्चांना उधाण आले. या व्हिडिओमध्ये एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत झिरवाळ दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित तृतीयपंथीय व्यक्तीवर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा व्हिडिओ सुमारे सहा ते सात महिन्यांपूर्वीचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, या व्हिडिओच्या निर्मितीबाबतही विविध दावे करण्यात येत आहेत. संबंधित तृतीयपंथीयाच्या नातेवाईकांनी हा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा करत ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अधिक माहिती समोर येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “हा प्रकार केवळ एक घटना नसून सार्वजनिक जीवनातील नैतिक अध:पतनाचे उदाहरण आहे,” असे म्हणत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि पुढील कारवाई काय होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
