…म्हणून जिल्हा परिषद सीईओ डॉ. बास्टेवाड झाले नाराज

घनकचरा प्रकल्पच कचऱ्याच्या विळख्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेने नेरळ विकास संकुल प्राधिकरण यांच्याकडून व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. तसेच नेरळ प्राधिकरणाच्या माध्यमातून प्राधिकरणमधील तीन ग्रामपंचायतींसाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी नेरळ ग्रामपंचायत येथे भेट दिली. आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा घनकचरा प्रकल्प हा यशस्वी झाला नसल्याने तसेच नेरळ परिसरात अनेक ठिकाणी जागोजागी कचरा आढळून येत असल्याने डॉ. बास्टेवाड यांनी नाराजी व्यक्त केली.

या दौऱ्यादरम्यान कर्जत गटविकास अधिकारी आणि प्रशासक चंद्रकांत साबळे, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, जि.प. उपअभियंता आणि प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी खिलारे, शाखा अभियंता जगताप, ग्रामविकास अधिकारी संजय राठोड, नेरळ ग्रामपंचायत माजी प्रभारी सरपंच अंकुश शेळके, माजी उपसरपंच केतन पोतदार, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

100 कर्मचाऱ्यांची फौज असतानादेखील नेरळ गावातील रस्त्याच्या बाजूला दिसून येत असलेला कचरा आणि ज्यासाठी 40 लाख खर्चून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे, त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग प्रक्रिया केंद्राच्या आजूबाजूला दिसून येत आहेत. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील पहिलाच प्रकल्प असल्याने या प्रकल्पाचे यश जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाचे आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करीत हा प्रकल्प यशस्वी करण्याचे उद्दिष्ट नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ प्राधिकरणमधील सर्व ग्रामपंचायतींनी ठेवावे, अशी सूचना डॉ. बास्टेवाड यांनी केली. ग्रामपंचायतीमधून निघणाऱ्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी आणि कचऱ्याचे विघटन झालेच पाहिजे यावरदेखील आक्रमक भूमिका डॉ. बास्टेवाड यांनी घेतली.

Exit mobile version