शिष्यवृत्ती परीक्षेचा टक्का वाढवण्यासाठी जि.प.चा उपाय

जिल्हा परिषद भरणार परीक्षा शुल्क

। रायगड । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा टक्का गेल्या काही वर्षांत घटला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदांनीही विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचे प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेने जिल्हा परिषदांना केला होता. रायगड जिल्हा परिषदेने सेस फंडातून शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव अर्ज प्रक्रिया आता 1 सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील पाचवी-आठवीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी राज्य शिक्षक परिषदेने विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून देण्याचे आवाहन केले होते.

पाचवी आणि आठवीत शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद सेस निधीतून भरल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात आली आहे. पाचवीसाठी वार्षिक पाच हजार, तर आठवीसाठी वार्षिक साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता विकासासाठी जिल्हा परिषद सेस फंड आणि इतर निधीतून परीक्षा परिषद निर्मित मार्गदर्शिका संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Exit mobile version