मुंबई
नवी मुंबई,प्रतिनिधी
सिडकोच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका घणसोली ते ऐरोली दरम्यान पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण करणार असून या प्रकल्पाकरिता आर्थिक योगदान देण्याचा निर्णयही सिडको महामंडळाने घेतला आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाकरिता सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनुक्रमे 50:50 या प्रमाणात खर्चाचा भार उचलण्यात येणार असून सिडकोतर्फे सदर कामाकरिता कमाल रु. 125 कोटींचा खर्च उचलण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प सिडकोतर्फे साकारण्यात येत आहे.
पाम बीच मार्गाच्या घणसोली ते ऐरोली दरम्यान करण्यात येणार्या विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडीवर मात करण्यासह सीबीडी बेलापूर ते मुंबई व ठाणे दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होऊन प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोने प्रकल्प खर्चाचा भार अंशत: उचलून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष सिडको
पाम बीच मार्गाचे एरोली ते घणसोली दरम्यानचे प्रस्तावित विस्तारीकरण हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रादेशिक संधानतेचाही (रिजनल कनेक्टिव्हिटी) एक भाग आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या अद्ययावत व्यापक परिवहन अभ्यासानुसार सदर संधानता हा ठाणे ते सानपाडा या किनारी मार्गाचा भाग आहे. रस्ते आणि पूल उभारून पाम बीच मार्गाचा 1.94 कि.मी. चा हा विस्तारीत टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणामुळे ऐरोली आणि घणसोली दरम्यान अधिक सुलभ संधातना लाभणार आहे. या प्रकल्पामध्ये सिडको कमाल रु. 125 कोटींची गुंतवणूक करणार असून प्रकल्पाची किंमत वाढत गेली तरी सिडकोकडून या व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्चाचा भार उचलण्यात येणार नाही. सदर विस्तारीकरण प्रकल्पाकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेणे, आवश्यक त्या परवानग्या मिळवणे ही जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेची असणार आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिडकोकडून नवी मुंबई महानगरपालिकेस प्रकल्प खर्चाचा निधी हस्तांतरीत करण्यात येणार आहे.