। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
शाळेचे गेट अंगावर पडल्याने एका शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केर्ले गावातील शाळेत ही दुर्घटना घडली. कुमार आणि कन्या विद्यामंदिर केर्ले या शाळेच्या गेटची पकड खिळखिळी झाली होती. सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने (13) या विद्यार्थ्याच्या अंगावर हे गेट पडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याला तातडीने रुग्णालयामध्ये तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे केर्ले गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, एका जीवघेण्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याने एका चिमुकल्याचा जीव गेल्याने पालकांकडून संतापदेखील व्यक्त केला जात आहे.